रेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी ...


'७ ऑगस्ट' हा दिवस  'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा होतो आहे.या निमित्ताने हा लेख..


२०१५ पासून दरवर्षी आपल्याकडे

७ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा होऊ लागला आहे. देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी ही सुरुवात केली आहे.


 हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, तसेच या वस्तूंची मागणी वाढावी, यासाठी ‘७ ऑगस्ट’ हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमध्ये 'इंडिया हँडलूम' या ब्रँडचे अनावरण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्ट हा दिवस हातमाग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

याच म्हणजे पुर्वी ७ ऑगस्ट १९०५या दिवशी,

स्वदेशी चळवळ ही संपूर्ण देशात सुरू झाली होती.


तर हा हातमाग म्हणजेच..

  हातांनी /पायांनी दोन्हीही वापरून चालवता येणारे यंत्र होय. हे म्हणजे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे  यंत्र आहे. सुताचे उभे धागे ताणात ठेवून आडव्या धाग्यांनी विणने होय.


ज्या यंत्रावर किंवा मशीनवर कापड विणले जातं, त्याला 'माग' म्हणतात. यावर हाताच्या सहाय्याने वस्त्र विणले जाते म्हणून त्याला 'हातमाग'  असेही म्हटले जाते. हातमागावर सुती किंवा रेशमी कापड उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणले जाते.


आपल्या भारतीय समाज रचनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यवसाया नुसार त्याची ओळख निर्माण झाली आहे.

विणकर म्हणजे विण करणारा.

म्हणजे दोन भिन्न रुप धारिणी या युवती स्वरुपी नियती सहा खुंट्याच्या मागावर, पुन्हा पुन्हा वस्त्र विणतात.

त्यामध्ये एक धागा काढते, 

आणि दुसरी जोडते..त्यांचे हे कार्य अविरत चालू असते.(ऋग्वेद१०.७.४२)


इसवी सन पंधराशे पासून पासून ते अठराशे पर्यंत या विणकर समाज अनेक देशांमध्ये आपले हे विणलेली वस्त्रे ते पाठवु लागले. आणि सर्वाना ही वस्त्रे अतिशय आवडु लागली होती.त्यामुळे साहजिकच यांची मागणी वाढली. म्हणुन हा काळ म्हणजे भारताचा सुवर्णकाळच होता.असं म्हणायला हरकत नाही.


भारत हा देश  विविधतेने नटलेला आहे. भारतात अनेक भाषाचे, संस्कृतीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. तशाच विविध कलाही या भारत भूमीत जोपासल्या आहेत. त्यातलीच एक कला म्हणजे ‘हातमागावर वस्त्र विणने’ ही होय. हातमाग हा व्यवसाय  देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. देशातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. आपल्या देशात शेतीनंतर हातमाग व्यवसाय हा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा रोजगाराचा पर्याय आहे. हातमागावर कापड विणण्याची कला पारंपरिक आहे. तसेच आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये विविध कला आहेत. त्यामुळे आपल्या या व्यवसायातून देशातील विविध कलेंचे आणि संस्कृतींचे नमुने जपता येतात.


‘या आपल्या सुंदर आणि कोमल शरीराची लज्जा रक्षण करत,तिला संरक्षण देऊन, आणखीन सुंदर ज्याने बनवले, ते म्हणजेच वस्त्र होय.’


वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जसे की लग्न समारंभ असो, किंवा काही विशिष्ट सोहळा साजरा करताना, आपण सर्वच उंची वस्त्रे परिधान करून त्या समारंभात मानाने, ऐटीत मिरवत असतो.

यामुळे त्या कार्यक्रमाची शान वाढते.आपलाही मान वाढतो.


कराग्रे वसते लक्ष्मी,करमध्ये सरस्वती.

या प्रमाणेच,ज्यां हातांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे विणली.त्या वस्त्रांची वेगवेगळी रूपे आपल्याला लाभली आहेत.पैठणी सारख्या महावस्त्राला तर जागतिक पातळीवर मान मिळाला आहे. 



रेशमाच्या रेघांनी |


लाल काळया धाग्यांनी |


कर्नाटकी कशिदा मी काढीला |


अन्, हात नका लावू माझ्या साडीला |




या शांताबाई शेळके यांच्या गीताच्या ओळी.


खरंच रेशीम धागे विणुन, आणि त्यात सुंदर असे   नक्षीकाम केलेले,रंगीबेरंगी फुलांच्या डिझाईन आणि मुख्यतः मोर हा पैठणीच्या सौदर्यांतील विशेष आकर्षण होय. यांचा मिळून एक कशिदा काढलेली ही साडी नेसणारी खूपच सुंदर दिसते. तिचं ते असणारं साधसं रूपही आकर्षक दिसून खुलून येतं. एकूणच मानवी जीवनात एक अनन्य महत्त्व या वस्त्रांना आहे.


आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत पण अन्नाशिवाय म्हणा की निवार्‍या शिवाय म्हणा आपण काही वेळ, काही तासही राहू शकतो. पण वस्त्राशिवाय…!!

कल्पनाच करवत नाही. एक सेकंदही आपण या शिवाय राहू शकत नाही. अगदी जन्मलेल्या बाळाला ही, लगेच छान मऊ कपड्यात गुंडाळावे लागते.


मी काही वर्षांपूर्वी देवांग पुराण ऐकले होते. त्यामध्ये महादेवाने ब्रह्मदेवांना विश्वनिर्मिती ची आज्ञा दिली. आणि ब्रह्मदेवाने मनू मार्फत विश्व निर्माण केले.विश्व निर्माण करून ते शिवस्थानी विलीन झाले.

पण मानव हा वस्त्राविना अवस्थेत राहू लागला.तो झाडांची साल पांघरूण, किंवा चर्म नेसुन स्वसंरक्षण करु लागला.याचा त्याला त्रासच होत होता.म्हणुन मग त्याने भगवान शंकराची आराधना केली.त्यांनी प्रसन्न होऊन देवल ऋषीला निर्माण केले.

 देवल ऋषींनी प्रथम विष्णूकडून धाग्यांची प्राप्ती करून घेतली. आणि प्रथम देवासाठी वस्त्रे विणली. 

त्यामध्ये महादेवाला व्याघ्रांबर.

महाविष्णुला पितांबर.

ब्रह्मदेवाला आंबा.

इंद्राला इंद्रनील, शचीला इंद्रयाग. 

सूर्याला श्वेत वस्त्र, चंद्राला चंद्रकांत.

अष्टवसु ला सोनेरी, गोपिकाला लाल इत्यादी. 


मग त्याने मयासुराकडून मानवासाठी वस्त्र विणायला चरखा व हातमाग मिळवला.

आदिमायेच्या आज्ञेनुसार ब्रम्हा, विष्णु, महेश ,नारद,शेष,नंदी आदि देवतांनी हातमागाच्या निरनिराळ्या भागांत वास करून रुपं दिली.

आणि पुढे मग यांचे वंशज विणकर म्हणून प्रस्थापित झाले. हे झाले पुराणातले.


आमच्या घरी म्हणजे, माझ्या माहेरी, चार हात माग चालत होते. माझे वडील नेहमी त्याविषयी बोलायचे .माझे काका, म्हणजे त्यांचे भाऊ. हे इतकी छान साडी विणत होते. की तिला भरपूर मागणी असायची. आणि चढ्या भावाने विकली जात होती. घरातील स्त्रिया कामे आवरली की, मग या हातमागावर विणत बसत असत. छोटी छोटी कच्ची कामे त्या करत असत. यावरच सर्व घराचा उदरनिर्वाह चालायचा. 

पण काही दिवसांनी यंत्र मागाचा शोध लागला. आणि आणि मग लोक हातमागांऐवजी यंत्रमाग वापरू लागली. यामुळे हातमाग कारागिरांचे व्यवसाय दिवसेंदिवस बंद पडत गेले. आणि म्हणुनच या सर्वांना पोटासाठी, रोजगारासाठी या कामगारांना शहराकडे स्थलांतर करावे लागले.


अगदी इसवी सन पूर्व काळापासून, एकोणिसाव्या शतकापर्यंत. या विणकरांनी अवघ्या जगाला आपल्या कुशल कलेने वेड लावले. विणकर समाजाचा हा प्रदीर्घ काळ म्हणजे, भारताचा सुवर्णकाळ होता. यांनी विणलेल्या कापडाला अगदी युरोपातून सुद्धा मागणी होती. जवळजवळ दोनशे प्रकारची वस्त्रे निर्माण होऊ लागली.यामध्ये ढाक्याची मलमल, बनारसी वस्त्रे, पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या आणि सुती व रेशमी तलम वस्त्रे. या सर्वांची जगावर जणू मोहिनीच पडली होती. त्यानंतर मात्र युरोपात यंत्रमागाच्या शोध लागला. आणि कापडाचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले.


भारतात बस्तान बसू पाहत असणाऱ्या इंग्रजांना, येथील बाजारपेठ काबीज करायची होती. त्यामुळे येथील लोकांचे आर्थिक नुकसान होऊन ते कमजोर होतील अन् मग आपण राज्य करु.

जशी त्यांची सत्ता स्थापित झाली. तसा पहिला मोर्चा त्यांनी विणकरां कडे वळवला. 'यांच्या कपड्याचा दर्जा खालावलेला आहे.' असे भासवू लागले. आणि अतिशय योजनाबद्ध पद्धतीने येथील उद्योग त्यांनी नष्ट करण्याचा चंग बांधला.


पण आता खादी वापराला प्राधान्य देऊन या व्यवसायाला पुन्हा पहाटेची चाहूल लागली आहे. ही नवीन पहाट नक्कीच या व्यवसायासाठी संजीवनीचे काम करेल यात शंकाच नाही.

या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधीत कलागुणांचा विकास होऊन, ती अधिक विकसित होईल. आणि आपल्या कडच्या या कौशल्याचे जतन केले जाईल. हाच या मागील उद्देश आहे.

हात मागावर तयार झालेली एक साडी विकत घेतली तर अंदाजे १५लोकांना काम मिळते.हा एक विशाल दृष्टिकोन ठेवून, म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांना ही आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, आपण यासाठी चे प्रयत्न करायला हवेत असा विचार करून ह्या संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे.

या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.


- सौ. शुभांगी सुहास जुजगर