अहिल्यादेवी होळकर



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खुप सोज्वळ व्यक्तीमत्व असलेल्या आणि सात्विक स्वभावाच्या होत्या.
 अहिल्यादेवी या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी महिला म्हणुन यांचा उल्लेख होतो.

त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावात झाला. अहिल्यादेवींचे वडील मानकोजी शिंदे हे एक साधारण शेतकरी होते. 
त्यांचं बालपण साधेपणात आणि धार्मिक वातावरणात गेलं. त्यांनी लहानपणीच शास्त्राध्ययन केलं आणि धार्मिकता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली.

लग्न आणि होळकर घराण्यात प्रवेश
अहिल्यादेवींचं लग्न इंदूरच्या होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत झालं. हे लग्न अहिल्यादेवींच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरलं. मल्हारराव हे एक वीर आणि शुर योध्दा असा त्यांचा मराठा साम्राज्यात नावलौकिक आणि दरारा देखिल होता.
असेच फिरत म्हणजे मोहिमेवर असताना त्यांना मंदिरात एक अतिशय चुणचुणीत आणि हुशार अशी मुलगी दिसली.
ती होती छोटी अहिल्या.
त्यामुळे त्यांनी या मुलीला आपल्या मुलासाठी म्हणजेच खंडेरावासाठी मागणी घातली आणि तीला सुन करून घेतले.
 
त्यांनी अहिल्येच्या गुणवत्तेला ओळखून त्यांना राजकारण आणि प्रशासनाच्या बाबतीत शिक्षण दिलं. त्यांचं आयुष्य आणि विचारधारा हे अहिल्यादेवींना पुढेराज्य चालविण्यासाठी प्रेरणास्थान ठरलं.


राजकीय कारकीर्द
१७५४ साली खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला. अहिल्यादेवी या सती जाण्यासाठी निघाल्या. पण मल्हाररावांनी त्यांना सती जावू दिले नाही."आम्हाला आता तुमच्या आधाराची खुपच गरज आहे " असे ते म्हणाले.
मल्हाररावांनी त्यांना राजकीय बाबतीत चांगलेच तरबेज केले.

 काही वर्षांनंतर मल्हारराव होळकरांचाही मृत्यू झाला. या दुहेरी दुःखानंतरही अहिल्यादेवीने धैर्याने परिस्थितीचा सामना केला. १७६७ साली त्यांनी इंदूरच्या सिंहासनाची जबाबदारी स्वीकारली. त्या काळात राज्यावर अनेक संकटं होती, परंतु अहिल्यादेवीने अत्यंत शिस्तबद्ध आणि न्यायाधारित पद्धतीने राज्याचं प्रशासन केलं.

प्रशासन आणि न्याय
अहिल्यादेवींच्या काळात इंदूर राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलली गेली. त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली, आणि राज्यातील करप्रणाली अधिक सुलभ केली. त्यांच्या प्रशासनात प्रत्येक माणसाचं मत आणि समस्या यांचा आदर केला जात असे. त्यांनी आपल्या न्यायप्रियतेमुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं.

धार्मिक आणि सामाजिक कार्य
अहिल्यादेवी या फक्त एक राजकीय नेता नव्हत्या तर एक धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या राज्यातील अनेक मंदिरांची निर्मिती आणि जीर्णोद्धार केला. काशीतील विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, आणि उज्जैनमधील महाकाल मंदिर यांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनीच केला. त्यांच्या कार्यकाळात भारतभरातील अनेक तीर्थक्षेत्रं विकसित करण्यात आली. त्यांच्या धार्मिक कार्यामुळे त्यांना "पुण्यश्लोक" हा उपाधी मिळाला.

अहिल्यादेवींनी केवळ मंदिरांच्या जीर्णोद्धाराचाच नाही तर सामाजिक सुधारणांच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलली. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि विधवाविवाहासारख्या सुधारणांना प्रोत्साहन दिलं.

अहिल्यादेवींची शासनशैली
अहिल्यादेवींची शासनशैली अत्यंत समतोल आणि मानवतावादी होती. त्या आपल्या राज्यातील लोकांशी थेट संपर्कात राहून त्यांची समस्या जाणून घेत आणि त्यावर तात्काळ उपाय करत. त्यांच्या राजकारणात धर्म, जाती किंवा वर्ग यांचा भेदभाव नव्हता. प्रत्येकाला न्याय मिळावा, हेच त्यांच्या प्रशासनाचं उद्दिष्ट होतं.

त्यांनी आपल्या काळात एक उत्कृष्ट रस्त्यांचं जाळं उभारलं, ज्यामुळे व्यापार, उद्योग आणि संपर्क साधनं यांचा विकास झाला. त्यांच्या काळात इंदूर एक समृद्ध आणि संपन्न राज्य म्हणून उदयास आलं. त्यांनी इंदूरला आपली राजधानी बनवलं, आणि तिथे अनेक सुंदर वास्तू बांधल्या.

अहिल्यादेवींच्या स्मृती
अहिल्यादेवींचं निधन १३ ऑगस्ट १७९५ रोजी झालं. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्याचा ठसा भारतीय इतिहासावर कायम राहिला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून इंदूरमध्ये त्यांच्या नावाने एक स्मारक उभारण्यात आलं आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आणि त्यांच्या नावाने स्थळांची निर्मिती केली गेली आहे.

आजही त्यांना भारतीय महिलांच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. अहिल्यादेवींच्या जीवनातून आपल्या सर्वांना धैर्य, परोपकार आणि न्यायप्रियतेचं महत्त्व कळतं. त्यांच्या कार्याची आणि विचारांची शिकवण आजही भारतीय समाजात आदराने पाळली जाते. त्यांच्या कार्याने त्यांना एक आदर्श शासक, आणि समर्पित धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अजरामर केलं आहे.

त्यांच्या कार्यामुळेच त्यांना "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" या नावाने ओळखलं जातं, आणि त्यांच्या जीवनकार्याचा प्रभाव आजही प्रासंगिक आहे.

सौ.शुभांगी सुहास जुजगर.